Marathi Prem Kavita | Marathi Prem Kavita Charolya | प्रेम कविता इन मराठी | Love Poem Marathi.

प्रेम कविता इन मराठी

86

माझ्या स्वप्नांच्या शामियान्यात…
माझ्या स्वप्नांच्या शामियान्यात उजेड करू नकोस,
कारण खूप दूरपर्यंत मला आयुष्याची सकाळ दिसत नाहीये,
माझ्या निमिष डोळ्यांमध्ये छापले गेलेत काळेकुट्ट ढग,
चहूकडे दुःखांचा पाऊस येईल कि काय असं साशंक मन झालंय !
चंद्र तारेच काय आता मला एखादा काजवा पण लुकलुकतांना दिसत नाही,
भयाण,निर्विकार आणि पारदर्शी अंधार दाटलाय माझ्या नजरेत,
एक चमचमणारी तलवार माझ्या हृदयावर वार करतीये,
जस कि कुणीतरी झोपलेल्या आणि हजार जखमांनी वार झालेल्या
माणसावर तो खरंच मेलाय ना हे तपासण्यासाठी पुन्हा वार करतो !
कुठल्यातरी गाण्याची धून कानामध्ये गुंजतीये,
जस कि तुटलेल्या पैंजणाचा जीवघेणा आवाज आहे,
मी जेव्हा पण डोळ्यांच्या कडा उघडझाप करतो,
ओलीचिंब, सरसरती एक वेदना दाटून येतीये !
तू तुझ्या रात्रींमध्ये काही तारे तारका मोजल्या असतील,
मी फ़क्त आणि फ़क्त अंधारात अंधार मोजलाय,
तू कधीतरी स्वप्नांचं एक गावं उभं केलं असशील,
मला स्वप्न हि नाहीत आणि गाव ते तर विचारू पण नकोस,
तू वीणेची एक हळुवार झंकार ऐकली असशील,
माझ्या आयुष्यात फ़क्त तुटलेल्या तारा आहेत,आणि त्या निःशब्द आहेत !
खूप जास्त प्रेम केलंस तू माझ्यावर, पण तुला माहितीये,
सुखाचा आणि अगतिकतेचा मेळच नाहीये माझ्या आयुष्यात
जिंदगी मरणप्राय यातना देतीये,
आणि मरण जिवंतपणी जळतंय !
नाही म्हणायला सगळंच आहे माझ्याकडे,
ज्या सवे मी जगू पण शकेल,पण ,पण ……
पण तुझ्या आयुष्यात खूप उजेड आहे अगं,
अंधाऱ्या रात्रींशी प्रेम करत बसू नकोस,
बघ तुझ्यासाठी नितळ ,शुभ्र सकाळ तुला उजेडाच्या दुनियेत सैर करायला चल म्हणतीये,
जा त्या सकाळ सोबत,आणि आयुष्याची सकाळ करून घे , पण हो …
माझ्या स्वप्नांच्या शामियान्यात उजेड करू नकोस,
कारण खूप दूरपर्यंत मला आयुष्याची सकाळ दिसत नाहीये !

Leave a Comment